हिरानंदानी इस्टेट मधील रहिवाशांना हवे सुशोभिकरण
हिरानंदानी इस्टेट फेडरेशन पुढाकाराने आयोजित बैठकीत रहिवाशांच्या शंकांचे समाधान
ठाणे – कावेसर उद्यान सुशोभिकरणासंदर्भात हिरानंदानी इस्टेट फेडरेशन यांच्या पुढाकाराने आज ठाणे महापालिका उद्यान विभागाचे अधिकारी आणि हिरानंदानी इस्टेट मधील रहिवाशांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत स्थानिक रहिवासी नसलेल्या `बाहेर’च्या लोकांनी गोंधळ घालून बैठक उधळण्याचा प्रयत्न केला. सुशोभिकरणाबाबत आमच्या शंकांचे समाधान झाले असून लवकरात लवकर काम सुरु करा, अशी सूचना हिरानंदानी इस्टेट जेष्ठ नागरिक फाउंडेशच्या सदस्यांनी यावेळी केली.
बैठकीत ज्यांना सुशोभिकरण हवे आहे आणि ज्यांचा या सुशोभिकरणाला विरोध आहे तसेच तलाव परिसरातील इमारतींमधील रहिवाशांना आमंत्रित करण्यात आले होते. बैठक सुरू होताच सुशोभिकरणाला विरोध असणाऱ्या नागरिकांनी गोंधळ घालून बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला.तरी देखील आयोजकांनी आणि संयोजकांनी विरोध करणाऱ्या नागरिकांना शांत बसून महापालिका कावेसर उद्यानाचे सुशोभीकरण कशा प्रकारे करणार आहे हे समजून घेण्याची विनंती केली. त्यानंतर गोंधळ घालणारे काही नागरिक बैठक सोडून बाहेर गेले. त्यानंतर त्याच्यातले काही लोक परत बैठकीला येऊन बसले. पुढे महापालिकेने आपले सादरीकरण उपस्थित नागरिकांसमोर केले. या सुशोभिकरणात काँक्रिटीकरण होणार नाही याचे स्पष्टीकरण देण्यात आले. तलावाला कुठलाही धोका या उद्यानाच्या सोशोभिकरणाने होणार नाही हे पण स्पष्ट करण्यात आले. सर्व सुशोभिकरण कायद्याला धरून स्थानिक नागरिकांच्या सुविधेसाठी करण्यात येईल याचे स्पष्टीकरण देखील महापालिकेच्या वतीने देण्यात आले. सर्व नागरिकांनी हे सुशोभिरण अतिशय उत्तम प्रकारे होणार आहे हे मान्य केले व महापालिकेचे आभार मानले.
सोशल मीडियावर या सुशोभिकरणाबद्दल काही नागरिकांच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यात येत असल्याचे देखील उपस्थित नागरिकांनी मान्य केले. काही नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन देखील महापालिकेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आणि संबंधित सुशोभिरण हे सर्वांच्या उपयोगासाठी होईल, अशी नागरिकांना खात्री मिळाली. उपस्थित नागरिकांनी सुशोभिकरण लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती देखील महापालिकेला केली.