जयदीप अहलावत आणि निम्रत कौर खलनायकांच्या भूमिकेत होणार सहभागी
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन मंच प्राइम व्हिडिओने आज आपल्या ओरिजिनल सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या अत्यंत अपेक्षित तिसऱ्या सिझनची अधिकृत झलक प्रदर्शित केली. दिग्दर्शक-द्वयी राज आणि डीके यांच्या D2R Films या बॅनरअंतर्गत तयार झालेली ही सिरीज एक थरारक गुप्तहेर-कथा आहे. मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेले ‘द फॅमिली मॅन’ हे पात्र श्रीकांत तिवारी म्हणून देशासाठी गुप्तचर एजंट म्हणून कर्तव्य बजावत असतानाच एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रेमळ पती आणि जबाबदार वडील म्हणूनही आपल्या भूमिका निभावतो.
राज, डीके आणि सुमन कुमार यांनी लिहिलेली आणि सुमित अरोरा यांनी संवाद लेखन केलेली ही सिरीज राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केली असून, या सिझनमध्ये सुमन कुमार आणि तुषार सेठ यांनीही दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. या वर्षात येणारा तिसरा सिझन श्रीकांतसाठी अधिक धोकादायक ठरणार असून, तो जयदीप अहलावत आणि निम्रत कौर यांच्या रूपातील नव्या, प्रबळ शत्रूंना सामोरा जाणार आहे. देशाच्या सीमांच्या आत आणि बाहेरून निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करत श्रीकांत नवीन वाटांवर प्रवास करणार आहे.
या सिझनमध्ये प्रियमणी (सुचित्रा तिवारी), शारिब हाशमी (जेके तलपडे), आश्लेशा ठाकूर (धृति तिवारी) आणि वेदांत सिना (अथर्व तिवारी) यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना पुन्हा दिसणार आहेत.
निकिल माधोक, डायरेक्टर आणि प्रमुख – ओरिजिनल्स, प्राइम व्हिडिओ इंडिया म्हणाले की , “ द फॅमिली मॅन ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्राइम व्हिडिओवरील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित फ्रँचाईझ बनली आहे. दुसरा सिझन संपताच तिसऱ्या सिझनसाठी प्रेक्षकांकडून प्रचंड मागणी येत होती आणि नेहमीप्रमाणे, राज, डीके आणि सुमन यांनी यंदा आणखी उत्कंठावर्धक आणि थरारक कथा सादर केली आहे. प्रेक्षकांना ही सिझन नक्कीच भावेल याची आम्हाला खात्री आहे.”
राज आणि डीके, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणाले, “प्रत्येक सिझनसह आम्ही कथा, व्याप्ती आणि अभिनय यामध्ये अधिक उंची गाठण्याचा प्रयत्न करतो. आमच्या चाहत्यांनी जे संयम ठेवला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. सिझन ३ मध्ये श्रीकांत आणि त्याच्या टीमला अतिशय धोकादायक परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे, जे त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांवर खोल परिणाम करणार आहे. या सिझनमध्ये श्रीकांत एका नवीन कौटुंबिक समिकरणालाही सामोरा जाणार आहे. जयदीप आणि निम्रत यांच्यासारख्या ताकदवान कलाकारांचा खलनायकाच्या भूमिकेत समावेश झाल्यामुळे कथेला एक नवीनच धार मिळाली आहे. प्राइम व्हिडिओने या सिझनसाठी खूपच उत्कृष्ट सहकार्य केले आहे.”