
नौवहन क्षेत्र विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेली ‘इंडिया मेरीटाईम विक 2025’ ही अभिनव परिषद मुंबई येथे सुरू असून मा.पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी विशेष उपस्थिती दर्शवित तसेच मा.केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी या उपक्रमाचे उद्घाटन करीत आधुनिक जगातील त्याचे महत्व अधोरेखित केले आहे.
अशा महत्वाच्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयांतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहयोगाने कार्यान्वित वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाविषयी (टीआरएफ) माहिती देणारा स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आलेला आहे. वस्त्र कच-यावर ठोस उपाययोजना करणारा हा देशातील पहिला प्रकल्प असून हा प्रायोगिक स्वरूपातील पायलट प्रोजेक्ट “पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल मॅनेजिंग बाय टेक्सटाईल व्हॅल्यू चेन बाय मॅनेजिंग पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल” अल्पावधीतच नवी मुंबईकर नागरिकांप्रमाणेच देशभराचे लक्ष वेधणारा ठरला आहे.
याव्दारे कच-यात टाकल्या जाणा-या कापडी कच-यावर पुनर्प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणला जात असून याव्दारे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे मोठे काम होत आहे. सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे कार्यान्वित वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्रातील ( टेक्सटाईल रिकव्हरी फॅसिलिटी – टीआरएफ) समुहाने वस्त्र कच-याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर याद्वारे वस्त्र कचरा हा महानगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पस्थळी न नेता त्याचा पुनर्वापर करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या केंद्राला मिळत असलेल्या नागरिकांच्या उत्साही सहकार्यामुळे हा उपक्रम अल्पावधीतच यशस्वी झाला असून त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे प्रदर्शन या परिषदेठिकाणी मांडलेल्या स्टॉलमधील विविध बाबींमधून करण्यात आले असल्याची माहिती उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे यांनी दिली.
त्याचप्रमाणे ही परिषद सागरी जीवनाशी संबंधित बाबींवर असल्याने या प्रदर्शनात मांडलेल्या स्टॉलद्वारे जैवविविधता आणि जलचर जीवनावर कापडी कचऱ्याचा कसा परिणाम होतो याची माहिती देण्यावर भर देण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांमधून गोळा केलेल्या पोस्ट कंझ्युमर टेक्सटाईल कचऱ्यापासून टीआरएफमधील महिला कारागिरांनी तयार केलेल्या शाश्वत उत्पादनांचाही समावेश या प्रदर्शनात करण्यात आलेला आहे. त्याला अनेक देशीपरदेशी नागरिकांची पसंती लाभत आहे.
सदर टीआरएफ प्रकल्प केंद्र सरकारचे वस्त्र मंत्रालय, वस्त्र समिती, नवी मुंबई महानगरपालिका यांच्यासह एसबीआय फाउंडेशन आणि टिसर आर्टिसन ट्रस्ट यांच्या सहकार्याने कार्यान्वित असून या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेतील सहभागामुळे या प्रकल्पाची वैशिष्ट्ये जगभरातील नागरिकांपर्यंत पोहचत आहेत.