
ठाणे,दि.3 :ठाणे जिल्ह्याचे सौंदर्य आणि समृद्ध संस्कृती जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक अनोखी ‘छायाचित्रण स्पर्धा २०२५’ आयोजित केली आहे. जिल्ह्यातील निसर्गाची भव्यता, वन्यजीव, लोकजीवन आणि बदलत्या ठाण्याचे विविध पैलू टिपण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हौशी,नवोदित, व्यावसायिक छायाचित्रकारांसह नागरिक, विद्यार्थी आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनाही एक उत्तम संधी मिळणार आहे.
या स्पर्धेमध्ये १) ‘वन्यजीव’, २) ‘निसर्ग’, ३) ‘संस्कृती आणि परंपरा’ तसेच ४) ‘बदलते ठाणे आणि विकास प्रकल्प’ या चार विषयांवर आधारित छायाचित्रे स्वीकारली जातील. प्रत्येक छायाचित्रकाराला प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त ४ छायाचित्रे पाठवता येतील. ही छायाचित्रे उच्च दर्जाची (High-Resolution HD 10MB) असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे thanedio2025@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवायची आहेत. छायाचित्रे सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांची निवड तज्ज्ञ समितीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या पहिल्या तीन उत्कृष्ट छायाचित्रांना आकर्षक बक्षिसे आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून यातून निवडलेल्या अंतिम १०० छायाचित्रांना संबंधित छायाचित्रकाराच्या नावासह ठाणे जिल्ह्याच्या नियोजित ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान मिळेल. या स्पर्धेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आहे.
ही स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.