

“मिस्टर परफेक्शनिस्ट” अन् माणूस म्हणून अढळ स्थान…!
आज एका अशा प्रशासकाचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ साजरा होत आहे, ज्यांनी आपल्या कार्याने केवळ प्रशासकीय क्षेत्रातच नव्हे, तर हजारो लोकांच्या हृदयात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
जिल्हाधिकारी श्री.अशोक मंदोदरी अंबादासराव शिनगारे, हे नाव केवळ एक पद नाही, तर ते दूरदृष्टी, कार्यतत्परता, संवेदनशीलता आणि लोककल्याणासाठी सतत धडपडणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. आज, दि.31 जुलै 2025 रोजी, ते त्यांच्या गौरवशाली प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत असताना, त्यांच्या दीर्घ, कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकहितैषी प्रवासाचा यथोचित सन्मान करणे, हे आपले कर्तव्य आहे.
अशोक शिनगारे: एक दूरदृष्टीचा प्रशासक
अशोक शिनगारे यांचा जन्म दि.1 ऑगस्ट 1965 रोजी झाला. हा केवळ योगायोग नाही की, त्यांचा जन्मदिवस ‘महसूल दिन’ म्हणूनही साजरा होतो. त्यांच्या जीवनात कृषी क्षेत्राचे सखोल ज्ञान रुजले होते, कारण त्यांनी एम.एस.सी. ॲग्रीकल्चरमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाने त्यांना केवळ जमिनीशी जोडले नाही, तर मातीतील प्रत्येक कणाला न्याय देण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक निर्णयातून येत असे. ठाणे जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रगतीची आधारशिला त्यांच्याच प्रयत्नांनी रचली गेली आहे, हे निश्चितपणे म्हणता येईल.
गौरवशाली प्रशासकीय प्रवासाची सुरुवात..
शिनगारे साहेबांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेचा प्रवास दि.7 ऑगस्ट 1993 रोजी कृषी विकास अधिकारी म्हणून सुरू झाला. या पदावर त्यांनी दि.30 एप्रिल 1994 पर्यंत काम केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून दि.23 मार्च 1994 रोजी त्यांची ‘उपजिल्हाधिकारी’ संवर्गात नियुक्ती झाली. ही त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाची पायरी होती.
त्यांनी दि.2 मे 1994 ते दि.1 मे 1996 या कालावधीत उपजिल्हाधिकारी परिवीक्षाधीन कालावधी म्हणून कामकाज पाहिले.
त्यानंतर दि.2 मे 1996 ते दि.3 नोव्हेंबर 1999 या कालावधीत त्यांनी हिंगोली, परभणी येथे उपविभागीय अधिकारी पदाची धुरा सांभाळली. या काळात त्यांनी ग्रामीण भागातील समस्या आणि लोकांच्या गरजा जवळून अनुभवल्या, ज्यामुळे त्यांची संवेदनशीलता अधिक वाढली.
विविध महत्त्वाच्या पदांवरील ठसा
श्री.शिनगारे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर आपल्या पारदर्शक कार्याचा ठसा उमटवला.
दि.4 नोव्हेंबर 1999 ते 31 जानेवारी 2003 या कालावधीत ते माजी गृहनिर्माण मंत्री श्री. रोहिदास पाटील यांचे खाजगी सचिव होते.
त्यानंतर दि.1 फेब्रुवारी 2003 ते 17 फेब्रुवारी 2003 या काळात ते राज्यमंत्री, गृहे (शहरे) यांचे खाजगी सचिव म्हणूनही कार्यरत होते. या पदांवर काम करताना त्यांना उच्चस्तरीय प्रशासकीय निर्णयप्रक्रियेचा अनुभव मिळाला, ज्यामुळे त्यांची निर्णयक्षमता अधिकच विकसित झाली.
दि.25 एप्रिल 2003 ते 18 जून 2003 या कालावधीत त्यांनी उल्हासनगर नागरी संकुलन, ठाणे येथे उपजिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी या पदाचे काम पाहिले. या काळात त्यांनी उल्हासनगरसारख्या गुंतागुंतीच्या शहरी भागातील समस्या हाताळल्या आणि प्रशासकीय कौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.
दि.7 जुलै 2003 रोजी त्यांना निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी पदाचा लाभ मिळाला, ज्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला आणखी गती मिळाली.
त्यानंतर दि.19 जून 2008 ते 31 जुलै 2012 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर या पदावर काम केले. मुंबईसारख्या महानगराचा प्रशासकीय अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला.
दि.31 जुलै 2012 ते 5 सप्टेंबर 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, ठाणे (मुख्यालय जव्हार) या पदावर काम केले, जिथे त्यांना आदिवासी भागातील लोकांच्या अडचणी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची संधी मिळाली.
दि.6 सप्टेंबर 2014 ते 5 एप्रिल 2016 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, ठाणे या पदावर काम केले. या काळात ठाणे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या.
दि.6 एप्रिल 2016 ते 25 सप्टेंबर 2016 या कालावधीत त्यांनी अध्यक्ष, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोकण भवन, नवी मुंबई येथेही आपली सेवा बजावली, जिथे त्यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती आणि सर्वोच्च पदांवर कार्य
त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि प्रामाणिक कार्याचे फळ म्हणून, भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची पदोन्नती झाली. दि.26 सप्टेंबर 2016 ते 30 मे 2018 या कालावधीत त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. जिल्हा परिषदेच्या कारभारात त्यांनी पारदर्शकता आणली आणि ग्रामीण विकासाला गती दिली.
दि.31 मे 2018 ते 8 सप्टेंबर 2020 या कालावधीत त्यांनी सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई या पदाचा कार्यभार सांभाळला. सिडकोसारख्या मोठ्या विकास प्राधिकरणात काम करताना, त्यांनी शहरी नियोजनात आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
दि.9 सप्टेंबर 2020 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत त्यांनी सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई म्हणून काम पाहिले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
दि.30 सप्टेंबर 2022 रोजी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द ही त्यांच्या प्रशासकीय प्रवासातील सुवर्णक्षण ठरली. त्यांनी ठाणे जिल्ह्याला प्रशासकीय शिस्त आणि विकासाच्या वाटेवर आणले. आणि आज, दि.31 जुलै 2025 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या कार्यकाळातील प्रमुख उपलब्धी
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे बदल आणि विकासकामे झाली, ज्यामुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळाली. त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख उपलब्धी:
मेट्रो कारशेडसाठी भूसंपादन: मेट्रो कारशेडसाठी जमिनीचे यशस्वी संपादन केले, ज्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला नाही आणि 20 लाखांहून अधिक प्रवाशांना सुलभ प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.
मुंबई मेट्रो मार्गिका क्र.4, 4अ, 10 व 11 या मेट्रो मार्गिकांच्या एकात्मिक कारशेड डेपोकरिता मौजे मोघरपाडा येथील स.न.30 मधील 174.01 हेक्टर आर क्षेत्राचा ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देण्यात आला.
मेट्रो कारशेड क्र.7अ व 9 च्या कारशेडकरिता मौजे डोंगरी येथील 59.79 हेक्टर आर क्षेत्राचा आगावू ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देण्यात आला.
मुंबई मेट्रो 12 कल्याण-तळोजा डेपोकरिता मौजे निळजे येथील 48.61 हेक्टर आर क्षेत्राचा आगावू ताबा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास देण्यात आला.
बुलेट ट्रेन प्रकल्प: ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याची त्यांनी सक्रियपणे देखरेख केली.
रेल्वे पायाभूत सुविधा विस्तार: भारतीय रेल्वेच्या अंतर्गत जिल्ह्यात नवीन रेल्वे लाईन्स जोडण्यास पाठिंबा दिला, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी आणि सेवा सुधारल्या.
ईस्टर्न फ्रीवे विस्तार: ईस्टर्न फ्री-वेच्या विस्तार कामावर त्यांनी लक्ष ठेवले, ज्यामुळे प्रदेशातील रस्ते जोडणी अधिक चांगली झाली.
मेट्रो लाईन अंमलबजावणी: जिल्ह्यातून जाणाऱ्या मेट्रो लाईन्सच्या अंमलबजावणीतील प्रमुख अडचणी त्यांनी दूर केल्या.
किनारी रस्ता (कोस्टल रोड) आणि कॉरिडॉर प्रकल्प: कोस्टल रोड आणि अनेक शहरी कॉरिडॉरसह मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीसाठी त्यांनी सुलभता आणली.
नवीन सिव्हिल हॉस्पिटल: ठाण्यात नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या बांधकामाला गती देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, जे आता पूर्णत्वाकडे आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा: जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ 81 हजार 44 नागरिकांना मिळाला.
शासन आपल्या दारी: राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या विशेष मोहिमेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील 45 लाख 42 हजार 673 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला.
नमो महारोजगार मेळावा: नमो महारोजगार मेळाव्याकरिता 66 हजार 226 इच्छुकांनी नोंदणी केली होती. त्यातील 39 हजार 625 जणांनी मुलाखती दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील 17 हजार 519 उमेदवारांना त्याच दिवशी नोकरी देण्यात आली.
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना: ठाणे जिल्ह्यातील पात्र महिलांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला.
दुर्गम भागात प्रमाणपत्र शिबिरे: दुर्गम आणि वंचित भागांतील रहिवाशांना आवश्यक प्रमाणपत्रे देण्यासाठी मोबाईल शिबिरे सुरू केली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
निर्यात वाढ: विशेषतः क्षेत्रांनुसार केलेल्या हस्तक्षेपांमुळे जिल्ह्याची निर्यात उलाढाल रु.45 हजार कोटींवरून रु.53 हजार कोटींपर्यंत वाढवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
शांततापूर्ण निवडणुका: श्री.शिनगारे यांच्या कार्यकाळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या. या निवडणुकांमध्ये कोणत्याही अनुचित घटना घडू नये याची त्यांनी खात्री केली.
महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटींचे व्यवस्थापन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटींसह अनेक उच्च-स्तरीय भेटींचे समन्वय साधला, ज्यामुळे नियोजन आणि अंमलबजावणी निर्दोष झाली.
ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प: ठाणे-बोरिवली भूमिगत बोगदा प्रकल्पाला गती दिली, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
महासंस्कृती महोत्सव: जिल्ह्यात दि.26 ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्रातील पर्यटन, लोककला, कोकणी कला आणि हस्तकला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली ठेव असलेल्या किल्ल्यांची माहिती देण्यात आली.
नागरिक समन्वय: नागरी समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी नगर परिषदा आणि महानगरपालिकांशी श्री.शिनगारे यांनी जवळून समन्वय साधला.
जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत निधी: जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत विविध विभागांसाठी विकास निधी सक्रियपणे एकत्रित केला आणि वितरित केला.
स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन: जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत MoU करण्यात आले व त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यात यशस्वी ठरले.
महानाट्य शिवराज्याभिषेक: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात “महानाट्य शिवराज्याभिषेक” सादर करण्यात आले. या महानाट्याकरिता दररोज साधारण 9 ते 10 हजार नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीदेखील अत्यंत मोलाची साथ दिली. प्रशासन अन् प्रसारमाध्यमे या दोन घटकांच्या सांघिक सहकार्याने ते सकारात्मकतेने व गतिमानाने कामकाज करू शकले.
“मिस्टर परफेक्शनिस्ट”: एक उपाधी नव्हे, तर जीवनशैली
शिनगारे साहेबांच्या एकूण 32 वर्षांच्या शासकीय सेवेच्या कारकिर्दीत त्यांना खऱ्या अर्थाने “मिस्टर परफेक्शनिस्ट” ही उपाधी प्राप्त झाली आहे. ही उपाधी त्यांना केवळ शासकीय कारकिर्दीतच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनालाही तंतोतंत लागू होते. कोणत्याही विषयाचा अचूक आणि सखोल अभ्यास, कोणताही विषय झटकन समजून घेवून त्यावर अतिशय संतुलित (BALANCED) निर्णय घेणे, कितीही तणावग्रस्त परिस्थिती असली तरी शांत राहणे आणि समोरच्या व्यक्तीचे मन समजून घेणे, त्या व्यक्तीला न दुखावता त्याला मदत करणे या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे शिनगारे साहेब तळागाळातील सामान्य व्यक्तीपासून ते सर्वोच्च पदावरील व्यक्तींच्या मनात आदराची जागा निर्माण करू शकले.
त्यांच्या या गुणांमुळेच ते फक्त एक अधिकारी नव्हते, तर एक संवेदनशील, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचे संबंध जपणारे व्यक्तिमत्व होते. आम्हा अधिकाऱ्यांसाठी ते नेहमीच एका मोठ्या बंधूंच्या भूमिकेतून एक आदर्श मार्गदर्शक ठरले. त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठीच नेहमी पथदर्शी ठरले आहे, ज्यामुळे आमच्यात प्रशासकीय शिस्त, दैनंदिन कामात गतिमानता, गुणवत्तापूर्ण कामकाज, प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि वक्तशीरपणा असे सकारात्मक बदल घडले.
एक यशस्वी ‘कप्तान’ आणि लोकसेवेचा आदर्श
“TRUE LEADERS SPEAK WITH ACTION” या उक्तीप्रमाणे अशोक शिनगारे सर खरोखरीच प्रशासनातील एक लोकप्रिय आणि यशस्वी ‘कप्तान’ ठरले आहेत. त्यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने गुणवत्तापूर्ण प्रशासकीय कामकाज करण्यात यशाचा टप्पा गाठला. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या सहवासात अनेक अधिकारी घडले. लोकसेवेचा वसा घेवून काम कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी घालून दिला. वरिष्ठांचा सन्मान राखून, सर्वांना सोबत घेवून लोकहिताची कामे यशस्वीपणे मार्गी लावण्यात त्यांचे कौशल्य या ठाणे जिल्ह्याने पावलोपावली अनुभवले. सरांनी, आम्हाला दिलेली लोकसेवेची ही शिकवण आम्ही यापुढेही अशीच सुरु ठेवण्यासाठी कटिबद्ध राहू. हीच खरी आजच्या दिवशी त्यांना दिलेली गुरुदक्षिणा असेल.
श्री. शिनगारे साहेब केवळ एक उत्तम प्रशासकच नव्हते, तर ते एक उत्तम वक्ता आणि एक उत्तम व्यक्ती देखील होते. त्यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत, कारण ती केवळ शब्दांची नसते, तर त्यात अनुभवांचे, संवेदनशीलतेचे आणि लोककल्याणाच्या भावनेचे प्रतिबिंब असे.
कुटुंबवत्सल व्यक्ती आणि माणूस म्हणून अढळ स्थान
आदरणीय अशोक शिनगारे साहेबांमध्ये आम्ही सतत जनसेवेसाठी धडपडणारा जसा प्रशासक पाहिला, तसाच त्यांच्यात एक कुटुंबवत्सल, प्रेमळ, हळवा, मेहनती, मितभाषी कुटुंबप्रमुखही पाहिला. ही गोष्ट निश्चित आहे की, जो आपल्या कुटुंबाची सर्वार्थाने काळजी घेतो, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आदर राखतो, ती व्यक्ती आपल्या प्रशासकीय सेवेतही त्याच पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांची, संस्थेची, व्यवस्थेची मनापासून काळजी घेतो. आणि म्हणूनच अशी व्यक्ती सर्वांच्या मनात आपले अढळ स्थान प्राप्त करते.
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या ‘माणसा’ने त्यांच्यातील माणुसकीने, आपल्या कर्तृत्वाने व गोड वागणुकीने असेच अढळ स्थान तुम्हा-आम्हा सर्वांच्याच मनात निर्विवादपणे मिळविले आहे. त्यांच्या निवृत्तीप्रसंगी, ठाणे जिल्ह्याचे भूषण डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह त्यांच्याविषयीच्या प्रेम आणि आदराखातर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, वन मंत्री मा. गणेश नाईक साहेब, पर्यटन मंत्री मा. शंभूराज देसाई साहेब, परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक साहेब, माननीय लोकसभा सदस्य डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सुरेश म्हात्रे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड, रविंद्र चव्हाण, किसन कथोरे, दौलत दरोडा, श्रीमती मंदा म्हात्रे, संजय केळकर, डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, शांताराम मोरे, महेश चौघुले, नरेंद्र मेहता, विश्वनाथ भोईर, रईस शेख, राजेश मोरे, श्रीमती सुलभा गायकवाड आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी साहेब, विविध क्षेत्रातील अन्य मान्यवर, ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! शिनगारे साहेबांच्या या प्रदीर्घ, यशस्वी आणि जनहितैषी प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना आम्ही सर्वजण मनःपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांचे मनस्वी अभिनंदनही करतो. शिनगारे साहेबांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आरोग्यदायी असे दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, अशा आमच्या हार्दिक सदिच्छा…! त्यांच्या पुढील वाटचालीस (Next Innings) खूप खूप शुभेच्छा…!