

देखावा, मूर्तीकार आणि स्वच्छता यांच्यासाठी स्वतंत्र पारितोषिके, अर्ज शुक्रवारपासून महापालिका मुख्यालय येथे होणार उपलब्ध
ठाणे (३०) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ठाणे महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे, आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेतर्फे घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेत देखावा-आरास, स्वच्छता आणि मूर्तीकार असे तीन विभाग आहेत. आरास गटातील विजेत्यांना स्पर्धकांना २५ हजार रुपयांचे पहिले, २० हजार रुपयांचे दुसरे तर, १५ हजार रुपयांचे तिसरे आणि १० हजार रुपयांचे उत्तेजनार्थ अशी रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तसेच, मूर्तीकार आणि स्वच्छता या गटातील विजेत्यांना प्रत्येक गटासाठी १० हजार रुपयांचे पहिले, ०७ हजार रुपयांचे दुसरे तर ०५ हजार रुपयांचे तिसरे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
सार्वजनिक गणेशोत्सव आरासस्पर्धेत सहभागी सर्व मंडळांना महापालिकेने निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना, अर्जाचा नमुना, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे शुक्रवार दि. ०१ ऑगस्ट, २०२५ पासून सकाळी ११.०० ते १.३० व दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) मिळू शकतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख गुरूवार, १४ ऑगस्ट, २०२५ अशी आहे. या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी.