
ठाणे (दि. 13) : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने जागरूक करण्यासाठी आणि प्राथमिक टप्प्यावर गंभीर आजारांचे निदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने 31 ऑगस्ट, 2025 रोजीपर्यंत कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 2 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट, 2025 या कालावधीत भिवंडी व कल्याण तालुक्यातील विविध भागांत एकूण 2 हजार 443 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 32 संशयित रुग्ण आढळले असून, त्यांना पुढील तपासणी व उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांकडे पाठविण्यात आले आहे.
या संशयित रुग्णांमध्ये –
• मुख कर्करोग: ८
• स्तन कर्करोग: १
• गर्भाशय मुख कर्करोग: १८
• इतर कर्करोग: ५
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. आधुनिक उपकरणांनी सज्ज कर्करोग तपासणी मोबाइल व्हॅनमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत, सुलभ आणि जलद तपासणीची सुविधा मिळत आहे. वेळीच निदान व उपचार केल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रभावी मात करता येते, हे या उपक्रमामुळे स्पष्ट होत आहे.