
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेना गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीही यावेळी शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामाचे कौतुक केले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळात गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, प्रवक्ते, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, रविंद्र वायकर, मिलिंद देवरा, प्रतापराव जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मराठमोळ्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो, त्यावेळी रायगडावर जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले, त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच पंतप्रधान झालो, अशा आठवणी यावेळी जागवल्या.
आज प्रत्येक भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भारलेला आहे. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे पॅरिस येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. जिथे २० पैकी १८ देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले १२ किल्ले युनेस्को (भारत) जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. हे भारताचे ४४ वे जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामुळे आपण जगात सहाव्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीने, आम्ही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करत असल्याची भावना शिवसेना खासदारांनी व्यक्त केली.
या यादीत महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश मराठा वारशाची व्याप्ती दर्शवितो. हे किल्ले डोंगरमाथ्यापासून किनारी चौक्यांपर्यंत पसरलेले आहेत आणि मराठ्यांच्या भौगोलिक विभाग आणि संरक्षण नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अधोरेखित होईल आणि आपल्या तरुणांमध्ये त्याच्या इतिहासाबद्दल एक नवीन चेतना आणि अभिमान निर्माण होईल. या किल्ल्यांचे संरक्षण होईल, पर्यटनाला चालना मिळेल, ते संशोधकांसाठी महत्त्वाचे अभ्यासस्थळ बनतील. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक नवीन चालना मिळेल. तुम्ही सर्व देशवासीयांना या किल्ल्यांना भेट देऊन मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जाणून घेण्याचे आवाहन केले आहे. तुमची हाक प्रत्येक भारतीयाला त्यांच्या मुळांशी जोडण्यासाठी प्रेरणा देईल, असा आम्हाला विश्वास आहे. या ऐतिहासिक वारशांचे जतन करण्यासाठी आणि त्यांचे वैभव वाढवण्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रयत्नात शिवसेना पक्ष पूर्णपणे तुमच्यासोबत आहे असे यावेळी शिवसेना खासदारांनी सांगितले.