
ठाणे ( 14 ) : ठाण्यातील प्रतिष्ठीत संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील १११ गोविंदा दाखल होणार आहेत. आज पाम क्लब येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी स्पेनमधील मॅरेक्स दे सॅाल्ट (Marrecs de salt) 111 गोविंदांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.
आपल्या दहीहंडी महोत्सवातून दोन देशातील संस्कृतीचे आदान प्रदान होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी या सर्व गोविंदांचे मनापासून स्वागत करतो. हा संघ ठाणे व मुंबईत विविध ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत, अशी माहिती पुर्वेश सरनाईक यांनी दिली.
आजपासून मॅरेक्स दे सॅाल्ट या संघाने पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव सुरु केला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी मनोरे रचले. संघात अगदी लहान मुला-मुलींपासून ते मोठ्यापर्यंतचा समावेश आहे.

दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे हा संघ सलामी देणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला रात्री ११ वाजता तलावपाळी येथील शिवसेना शाखा येथे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सदर संघ सलामी देईल.
दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी श्री सिद्धीविनायक मंदिरास स्पेनचा संघ भेट देणार असून त्या ठिकाणी मानवी मनोरे रचून सलामी देणार आहेत. संध्याकाळी माझगांव, ताडवाडी येथे हा संघ भेट देईल.
दि. 16 ऑगस्ट गोपाळकाला दिवशी संस्कृती दहीहंडीत सहभागी होतील.
