
गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी सांगणारा ‘वडापाव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता ‘हरवल्या वाटा’ हे भावस्पर्शी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. या गीतातल्या प्रत्येक ओळी नात्यांमधला गोडवा आणि दुरावा एकाच वेळी व्यक्त करतात. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांचा मनाला भिडणारा आवाज, गीतकार मंदार चोळकर यांचे साधे तरीही हृदयस्पर्शी शब्द आणि संगीतकार कुणाल करण यांनी दिलेली सुरेख धून यामुळे हे गाणं मनात खोलवर घर करत आहे.
नात्यात आलेल्या दुराव्यावर हे गाणं आहे. आपल्या जवळच्या माणसांपासून अनपेक्षितपणे निर्माण झालेला हा दुरावा संपूर्ण कुटुंबाला वेढून टाकत असल्याचे या गाण्यातून दिसतेय. हा दुरावा का निर्माण झाला, यामागची खरी कारणं प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊनच कळतील. ‘हरवल्या वाटा’ हे गाणं प्रेक्षकांना त्या भावनिक प्रवासाची झलक दाखवतं आणि त्यांना अंतर्मुख करतं.
दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, “हे गाणं कथानलाला वेगळं वळण देणारं आहे. मंदारचे शब्द, कुणालचं संगीत आणि सोनूजींचा आवाज, या तिघांच्या एकत्र येण्याने गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे.
गायक सोनू निगम म्हणतात, ‘’‘हरवल्या वाटा’ गाणं रेकॉर्ड करताना प्रत्येक ओळीने मला अंतर्मुख केलं. या गाण्यात नात्यांतील वेदना आणि आशेचं प्रतिबिंब आहे. या गाण्यातून व्यक्त झालेली प्रत्येक भावना प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे.”
एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.
या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत. येत्या २ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांना या’वडापाव’ची चव चाखता येणार आहे.