
मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा चित्रपट आपला पन्नासावा गौरवशाली दिवस साजरा करत आहे. आठव्या आठवड्यातही हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचत असून मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नांदेड, जालना, जळगाव या शहरांसह अनेक ठिकाणी या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे. भावनिक आणि मनोरंजक क्षणांनी सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.
निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. या दोघींनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध, संवादातील सहजता आणि अभिनयातील नैसर्गिकता यामुळे चित्रपटाला वेगळी रंगत मिळाली आहे. त्यांच्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांना चित्रपटाशी भावनिक नाळ जोडता आली असून अनेकांनी चित्रपट पाहाताना हसत-हसत आणि काही प्रसंगांमध्ये भावूक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळेच हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करत आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ गौरवशाली ५० वा दिवस साजरा होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. कारण, माझं नेहमी एकच म्हणणं असतं की, बाई जर घर चालवू शकते तर नक्कीच चित्रपटही चालवू शकते. माझ्या स्त्रीप्रधान चित्रपटांना जो अभूतपूर्व प्रतिसाद रसिकप्रेक्षकांनी दिला त्याबद्दलचं एक दडपण असताना देखील वेगळा विषय, सासू-सूनेबद्दलच्या भावभावना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा माझा प्रयत्न होता आणि या प्रयत्नांना अत्यंत सुखद आणि आनंददायक यश प्रेक्षकांकडून मिळालं. त्यामुळे मी प्रेक्षकांचा कायमचा ऋणी आहे आणि या यशाने एक जाणीव होते की, यापुढे अधिक चांगलं काम केलं पाहिजे.”
या यशाबद्दल बोलतांना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की, ” प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद खूप समाधानकारक आहे. भावनिक आशय आणि सोबतीला मनोरंजनाची जोड असलेल्या कलाकृती प्रेक्षकांना नेहमीच आवडतात हे या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सलग आठ आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने पन्नास दिवसांचा टप्पा गाठणे हा आमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा क्षण आहे. यासाठी मी झी स्टुडिओजच्या वतीने संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो आणि प्रेक्षकांचे आभार मानतो.”
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे.