
ठाणे (22) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात येणार असून, पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट कायम राखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबविण्यात येते. सर्व बालकांना विहित वयानुसार प्राथमिक लसीकरण मिळावे, तसेच तीव्र शिथिल पक्षाघात (AFP) सर्वेक्षणाच्या माध्यमातून पोलिओसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी राज्यात सन 1995 पासून ही मोहीम दरवर्षी आयोजित केली जाते.
यंदाच्या मोहिमेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 5 वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध लसीकरण केंद्रे, आरोग्य केंद्रे, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिओ बुथ उभारण्यात येणार आहेत. पालकांनी आपल्या मुलांना या बुथवर आणून पोलिओचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
29 जून ते 3 जुलै 2026 या कालावधीत विशेष गृहभेट मोहीमही राबविण्यात येणार आहे. या काळात आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घराघरांत जाऊन बुथवर न आलेल्या किंवा लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना पोलिओ डोस देणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पोलिओची लस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
बालकाला नियमित लसीकरण झाले असले तरी पल्स पोलिओ मोहिमेतील डोस देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहू नये. “पोलिओसारख्या गंभीर आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पालकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.