
लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रनिष्ठेची प्रतिज्ञा
ठाणे (13) : केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते आज महापालिका मुख्यालयात करण्यात आले.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त दीपक झिंजाड यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढावा, या उद्देशाने महापालिका मुख्यालयात आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
यावेळी उपस्थितांनी तिरंगा ध्वज, स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांच्या भावनेचा सन्मान करण्याची तसेच भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेत प्रतिज्ञेच्या कॅनव्हासवर स्वाक्षऱ्या करून राष्ट्रनिष्ठेचा संकल्प व्यक्त केला. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक आणि वीर हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या विकासासाठी आपले योगदान देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.