
समर, आयुषी, स्काय, रूचीसोबत क्रांती रेडकर वानखेडे आणि उर्मिला कानेटकर यांची खास नृत्य अदाकारी
गणरायाच्या आगमनाचा उत्साह, ढोल-ताशांचा जल्लोष आणि भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणारं ‘तुझे नाव घेता’ हे बहारदार गणपती गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यातील धमाकेदार नृत्य आणि फेस्टिव्ह मूड लक्ष वेधून घेत आहे.
शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांच्या दमदार आवाजात स्वरबद्ध झालेल्या या गाण्याला गुरू ठाकूर यांचे शब्द लाभले आहेत तर पंकज पडघन यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. समर, आयुषी, स्काय, रूची यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याच्या उत्साहात एक खास सरप्राईजही पाहायला मिळतं. दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघींची खास नृत्य अदाकारी या गाण्यात पाहायला मिळते. अनेक काळानंतर या दोघींना एकत्र नृत्य करताना पाहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याने गाण्याची रंगत आणखीच वाढली आहे.
समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले असून मनोज खळतकर निर्माते आहेत, तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘मैत्रेया’ येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
LINK :