भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, ठाणे जिल्ह्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष आर्थिक साक्षरता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचा उद्देश सामान्य नागरिकांमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील, महिला, वृद्ध नागरिक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यात वित्तीय जागरूकता निर्माण करणे आहे. यामध्ये डिजिटल आर्थिक साक्षरता, जबाबदारीने कर्ज घेणे, फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता, तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना या सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, डीसीसी बँक यांच्या ग्रामीण शाखा या मोहिमेत सक्रीय सहभाग घेतील. बँक शाखांमार्फत शिबिरे, गावोगावी जाऊन जनजागृती आणि प्रचार कार्यक्रम राबविले जातील. दुर्गम व दुर्लक्षित भागांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाईल. सर्व नागरिक, स्वयं-सहायता समूह, ग्रामस्तरीय अधिकारी, पंचायत प्रतिनिधी व स्थानिक प्रसारमाध्यमांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा.
अधिक माहितीसाठी किंवा आपल्या परिसरातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नजीकच्या बँक शाखेशी किंवा ठाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.