
ठाणे, ( 3 मार्च 2026) ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील पाच परिमंडळात होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर वाहतुक शाखेने वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्या 1 हजार 681 जणांवर कारवाई केली. पोलिसांच्या नाकाबंदीत 196मद्यपी चालक तावडीत सापडले. यासह विनाहेल्मेट 836, फ्रंट सीट 227, विरुद्ध दिशेने येणारे 14 आणि 408 ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार होळी व धुळवडीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहतूक विभागातील 450 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात केले होते. होळी – धूलिवंदन कालावधीत मद्य प्राशन करून किंवा नशा करून वाहन चालविणार्या चालकांवर कारवाई करण्याची व्यूहरचना वाहतूक विभागाने केली होती.
पाच परिमंडळात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली होती. या नाकाबंदीत नशापान किंवा मद्यप्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्या तब्बल 196 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तर 836 विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे, 408 ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ऑटो रिक्षामध्ये फ्रंट सीट घेणाऱ्या 227 चालकांवर कारवाई केली असुन विरुद्ध दिशेने वाहने दामटविणारे 14 वाहन चालक तावडीत सापडले आहेत. अशा एकुण 1681 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्या धुळवडीचा रंग पोलिसांनी उतरवला.