
ठाणे महापालिका आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे (20) : गृह निर्माण व शहरी कार्य मंत्रालय व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेंतर्गत १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोक कल्याण मेळावा ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर २०२५ पासून भारतीय स्टेट बैंक ऑफ इंडिया यांच्या समन्वयाने ‘लोक कल्याण मेळाव्याचे’ आयोजन ठाणे महापालिका प्रभाग समिती क्षेत्रात सुरू करण्यात आले आहे. सदर मेळाव्यामध्ये पथविक्रेत्यांचे नवीन अर्ज भरणे, मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांना कर्ज वितरित करणे व त्यांना डिजीटल व्यवहाराबावत माहिती देण्यात येत आहे.
१८ सप्टेंबर रोजी भारतीय स्टेट बँकेच्या कळवा शाखेत लोक कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला. सदर मेळाव्यास समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, एसबीआय बँकेचे प्रादेशिक विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार धिंग्रा, मुख्य व्यवस्थापक विवेक शर्मा मुंबई मेट्रो लोकल हेड विभाग, सुरेंद्र सिंग, विभागीय मुख्य व्यवस्थापक एम. एस. दिव्याशिल्पी, उप मुख्य व्यवस्थापक रामहरी शर्मा तसेच दीनदयाळ जन आजीविका योजनेचे सर्व व्यवस्थापक व समुदाय संघटक उपस्थित होते.
लोक कल्याण मेळावा २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध बँकासोबत राविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल प्रथम कर्ज रू १५,०००/- द्वितीय कर्ज रू. २५,०००/- व तृतीय कर्ज रू. ५०,०००/- कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणे, बँकेकडे प्रलंबित असलेले कर्ज प्रकरण निकाली काढणे, नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे, डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देणे, योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर हफ्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना युपीआय लिंक्ड क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजने अंतर्गत फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. पथविक्रेत्यांचे सामाजिक -आर्थिक सर्वेक्षण करून ८ योजनांचा लाभ देण्यात येणार आहे तसेच अन्न पदार्थ विक्री करणा-या पर्यावक्रेत्यांना FSSAI मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे लोक कल्याण मेळावे इतर बँकांना आयोजित करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.
केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचा कर्ज कालावधी ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवला आहे. या योजनेचा लाभ घेणेकरिता नजीकच्या सेवा केंद्राशी संपर्क करून अर्ज करावा. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी समाज विकास विभाग, ठाणे महानगरपालिका येथे संपर्क करावा. या मेळाव्याच्या निमित्ताने पथविक्रेते, फेरीवाले किरकोळ विक्रेते, हातगाडीधारक व छोटे उद्योजक यांनी PMSVANidhi या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त (समाजविकास विभाग) अनघा कदम यांनी केले आहे.