
म्हाडा आणि महापालिकेतील वादात म्हाडा रहिवाशांसमोर आर्थिक भुर्दंडाचे संकट उभे राहिले आहे. त्यांना आलेल्या लाखो रुपयांच्या मालमत्ता कर देयकांमुळे रहिवासी गर्भगळीत झाले आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात त्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की म्हाडा आणि महापालिका यांच्यातील वादामुळे म्हाडा रहिवाशांना लाखोंची मालमत्ता कर देयके आली होती. त्यामुळे रहिवाशांसमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. वास्तविक म्हाडाने हे पैसे भरणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे म्हाडाचे पैसे ठाणे महापालिका देणे लागते. मात्र महापालिका ते देत नाही. अशात महापालिका लाखोंची देयके पाठवून रहिवाशांना वेठीस धरत आहे. याबाबत रहिवाशांनी ही बाब माझ्या कानावर टाकल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी रहिवाशांना यापुढे देयके पाठवणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी कबुल केले.

दरम्यान महापालिकेतील अभियंता विभागातील कंत्राटी कामगार दहा-दहा तास काम करूनही त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. मात्र अद्याप कंत्राटदाराने हा विषय गांभीर्याने घेतला नसून या तक्रारींकडे कानाडोळा केला आहे. महापालिकेत कंत्राटदारराज सुरू असून त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना हटविण्यात यावे, याबाबत आग्रही राहणार असून लवकरच महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि कामगार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे केळकर म्हणाले.
आजच्या कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या गलथानपणाचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याबाबत अर्ज केले असून एक वर्ष उलटूनही फेरतपासणी न झाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी फेरतपासणी करून देण्याचे कबूल केले आहे, अशी माहिती केळकर यांनी केली आहे.

या कार्यक्रमात फसवणुकीसंदर्भात अनेक निवेदने प्राप्त झाल्याचेही केळकर यांनी सांगितले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष भोईर, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका माधुरी मेटांगे, सचिन पाटील, राजेश गाडे, योगेश भंडारी आदी उपस्थित होते.