
ठाणे (21) : नालेसफाई कामादरम्यान नाल्यातून गेलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्युत केबल्स अडथळा ठरत असून या केबल्समुळे नाल्यातील कचरा अडकून राहतो आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. नालेसफाई व्यवस्थित होण्यासाठी नाल्यातून गेलेल्या विद्युत केबल्स एकत्रित करुन केबल्स सुरक्षित राहतील व कामातही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिका तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळ तसेच टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत दिले.
आज (मंगळवार दिनांक 22/02/2026) महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगरअभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळाचे माणिक राठोड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम, सतीश जाधव, टोरंट पॉवर कंपनीचे सन्होसेन खोब्रागडे, मदन धामुणसे आदी उपस्थित होते.
नाल्यातून गेलेल्या केबल्सच्या जाळ्यामध्ये कचरा अडकणे, तसेच लोंबकळत असलेल्या केबल्समुळे नाल्यातील जेसीबीला अडथळा निर्माण होणे, केबल्स तुटणे, नाल्यात उतरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या केबल्समुळे कर्मचाऱ्यांना अपघात होणे हे प्रकार घडत आहेत. यासाठी ज्या ज्या कंपन्याच्या केबल्स नाल्यामधून गेलेल्या आहेत त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन सद्यस्थितीत या केबल्स एकत्रित करुन नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करुन ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या.
तसेच याबाबत प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक आयोजित करुन भविष्यात नाल्यातील केबल्स या भूमीगत करता येतील किंवा कसे याबाबतच्या उपाययोजना तयार कराव्यात. तसेच भविष्यात ना्ल्यातून किंवा गटारातून कोणतीही केबल जाणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. तसेच केबल्स टाकताना महानगरपालिकेची परवानगी घेवूनच सर्व कामे करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. तसेच जे प्राधिकरण परवानग्या न घेता केबल्स टाकतील अशांवर दंड आकारण्याबाबतही महापौरांनी सूचित केले.