
ठाणे : स्पेनमधील बार्सिलोना आणि विलाफ्रांका येथे रंगणाऱ्या ‘कॅटालोनिया मानवी मनोरा स्पर्धा २०२६’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ठाणे शहरातील विविध गोविंदा पथकांमधून निवड झालेल्या गोविंदांचा उत्साहात सत्कार करण्यात आला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय मानवी मनोऱ्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी ठाणे शहरातील विविध गोविंदा पथकांमधील खेळाडूंची निवड झाली आहे. या निवडीत ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाचे सल्लागार विलास हरपाल, ‘खोपटचा राजा’ गोविंदा पथकाचे साकेत सावंत, ‘सी. पी. तलावचा राजा’ गोविंदा पथकाचे आकाश प्रमोद सकपाळ, ‘रामनगरचा राजा’ गोविंदा पथकाचे ऋतिक रमेश शेलार, ‘मस्ती ग्रुप’ गोविंदा पथकाचे नंदकुमार अरुण गटकुळ, ‘सहयोग’ गोविंदा पथकाचे तेजस बोरसे, ‘आई चिखलादेवी’ गोविंदा पथकाचे सागर पाटील आणि संकल्प महिला गोविंदा पथकाची कृपा सावंत यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाच्या वतीने या सर्व गोविंदांचा गौरव करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजोल गुणिजन, किशोर गुणिजन, ‘ठाण्याचा राजा’ गोविंदा पथकाचे प्रशिक्षक कोमल देशमुख, तसेच राकेश यादव, रोहित धोंडगे, सिद्धेश जगताप आणि संदीप कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
ठाण्यातील गोविंदा पथकातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गोविंदांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि कौशल्याला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील दाद असून, ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
स्पेनमध्ये भारतीय संस्कृतीतील मानवी मनोऱ्याची परंपरा, गोविंदा पथकांचे कौशल्य आणि महाराष्ट्राच्या दहीहंडी उत्सवाची परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील या गोविंदांच्या स्पेनवारीकडे ठाणेकरांचे विशेष लक्ष लागले आहे.