
ठाणे (4 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सण-उत्सवांच्या काळात ध्वनिक्षेपक प्रणाली (Sound System), अॅम्प्लिफायर तसेच फटाक्यांच्या अनियंत्रित वापरामुळे होणारे ध्वनी व पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दूरध्वनी क्रमांकासह प्रभाग समितीनिहाय स्वतंत्र ई-मेल सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
सण-उत्सवांच्या काळात ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर, अॅम्प्लिफायरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण तसेच फटाक्यांच्या अतिवापरामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना याचा त्रास होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपल्या परिसरातील ध्वनी व पर्यावरण प्रदूषणासंदर्भातील तक्रारी सहजपणे नोंदविता याव्यात आणि त्यावर योग्य कार्यवाही करता यावी, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
नागरिकांना प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील तक्रार निवारण यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी +91 86578 87102 हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रभाग समितीच्या हद्दीतील तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल पत्ते निश्चित करण्यात आले आहेत.
प्रभाग समितीनिहाय ई-मेल पत्ते पुढीलप्रमाणे :
१. माजिवडा-मानपाडा – amcmaj@thanecity.gov.in
२. उथळसर – amcjog@thanecity.gov.in
३. वर्तकनगर – amcvar@thanecity.gov.in
४. वागळे – amcwag@thanecity.gov.in
५. लोकमान्य-सावरकर – amclok@thanecity.gov.in
६. कळवा – amckal@thanecity.gov.in
७. मुंब्रा – amcmum@thanecity.gov.in
८. दिवा – amcdiva@thanecity.gov.in
९. नौपाडा – amcnau@thanecity.gov.in
नागरिकांनी आपल्या परिसरात ध्वनिक्षेपक प्रणाली, अॅम्प्लिफायर किंवा फटाक्यांच्या अनियंत्रित वापरामुळे ध्वनी व पर्यावरण प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास वरील दूरध्वनी क्रमांकावर किंवा संबंधित प्रभाग समितीच्या ई-मेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
या तक्रार निवारण सुविधेमुळे नागरिकांना प्रदूषणासंदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी सुलभ माध्यम उपलब्ध झाले असून, सण-उत्सव पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरे करण्यास मदत होणार आहे.