
१८६ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर होऊनही पदस्थापनेची कार्यवाही रखडली; कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
ठाणे प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक पदाच्या ८० जागा रिक्त असून, जून २०२५ पासून संबंधित कर्मचारी पदस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. या पदोन्नतीसाठी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या आस्थापना विभागाने १८६ कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, यादी प्रसिद्ध होऊनही अद्याप पुढील कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
महापालिकेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात वरिष्ठ लिपिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे रिक्त पदांवरील पदस्थापनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी महापौर अशोक वैती यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘आनंद जनसंवादा’च्या माध्यमातून हा प्रश्न मांडला होता.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी (१८ नोव्हेंबर) अशोक वैती यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी वरिष्ठ लिपिक पदाच्या पदस्थापनेबाबत आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली. रखडलेली प्रक्रिया मार्गी लावून संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे वैती यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र साप्ते, रतन अवसरमल, संदीप शिंदे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.