
आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांकडून कशा प्रकारचा अभ्यास करणे अपेक्षित आहे, तो कशा पद्धतीने केला पाहिजे हे सांगताना, आपल्या शिक्षण पध्दतीत गुणांना महत्व असून ते आपण नाकारूच शकत नाही. मात्र हे करताना विषयाचे आकलन करून घेणे अत्यंत महत्वाचे असून त्यादृष्टीने सर्वात प्रथम वाचणे, त्याचा अर्थ समजून घेणे आणि तो परीक्षेत मोजक्या शब्दात मांडणे हा क्रम अंगिकारायला हवा. त्यादृष्टीने समजून घेत वाचनाची सवय किती महत्त्वाची आहे हे सांगत मानसोपचार तज्ज्ञअरूण नाईक यांनी उच्च शिक्षण अथवा व्यवसाय क्षेत्र निवडताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत, अप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय, ती कशी केली जाते, तिचे जीवनातील करिअरच्या दृष्टीने महत्त्व काय ? याविषयी सविस्तर भाष्य केले.
शिव समर्थ सहकारी पतपेढी लि., ऐरोली, नवी मुंबई यांच्या वतीने विद्यार्थी व पालकांकरिता आयोजित शिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन शिबीर आणि सभासद प्रशिक्षणाप्रसंगी सेक्टर 5 ऐरोली येथील मढवी सभागृहात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आयपीएच मधील सहकारी अरूण नाईक बोलत होते. याप्रसंगी पतपेढीचे अध्यक्ष मधुकर पाटील, विश्वनाथ साळवी, गणेश आघाव आणि सर्व संचालक मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव समर्थ सहकारी पतपेढी लि. यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना बचतीचे महत्त्व कळावे व बँकिंग व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने नव्याने सुरू होणाऱ्या शिव समर्थ बालसंचय योजनेची घोषणा करण्यात आली व या योजनेंतर्गत बचतीच्या खजिना पेटीचे अनावरण करण्यात आले.

सभासद प्रशिक्षणाअंतर्गत जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री तानाजी पानस्कर यांनी सव्वाशेहून जास्त वर्षांचा वारसा असणाऱ्या सहकार चळवळीचे राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासातील महत्त्वाचे योगदान सांगतानाच सहकार क्षेत्रात घडत असणाऱ्या विविध बदलांची माहिती दिली. सहकार क्षेत्र अधिक मजबूत होण्यासाठी सभासद प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले व यासाठी पुढाकार घेणा-या शिवसमर्थ पतपेढीचे कौतुक केले. सौ.सीमा कोंडे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले.
यावेळी सभासदांच्या दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर पदवी विशेष गुणांनी प्राप्त केलेल्या पाल्यांचा पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.