
ठाणे : भारतीय संविधानाचा गौरव, संविधानातील मूलभूत मूल्यांचा प्रसार आणि नव्या पिढीमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तीन दिवसीय ‘संविधान महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या संकल्पनेतून २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान गावदेवी मैदान येथे हा महोत्सव पार पडणार आहे.
या महोत्सवात संविधान विषयक भव्य रांगोळी प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ नोव्हेंबर रोजी लोकशाहीर नंदेश विठ्ठल उमप प्रस्तुत ‘कोहिनूर भारताचा’ हा विशेष संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. तर २५ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘संविधान भारताचे’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
२६ नोव्हेंबर रोजी शिवशाहीर पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रेरणेतून साकारलेला ‘शिवकल्याण राजा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महोत्सवाच्या मुख्य सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, मान्यवरांचा सन्मान तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत महापालिका भवन येथे संविधान सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले.
संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावीत, विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी आणि लोकशाहीप्रती नागरिकांची बांधिलकी अधिक दृढ व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या तीन दिवसीय संविधान महोत्सवात ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र माझा न्यूज – प्रत्येक घडामोडीवर निर्भीड नजर!