
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात ‘4 बिन ठाणे क्लीन’ या विशेष अभियानाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कचऱ्याचे स्रोतस्थळी वर्गीकरण करून अधिक प्रभावी कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि शास्त्रीय विल्हेवाट याला चालना देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
यावेळी उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून शहरातील प्रत्येक घर, गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनी कचऱ्याचे चार स्वतंत्र प्रवाहांमध्ये वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताविषयक कचरा आणि विशेष काळजी कचरा या चार प्रकारांचा समावेश आहे.
ओल्या कचऱ्यात स्वयंपाकघरातील सेंद्रिय व खाद्यपदार्थांचा कचरा, सुक्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक, धातू व पुनर्वापरयोग्य वस्तूंचा समावेश होतो. स्वच्छताविषयक कचऱ्यात डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स आदी वस्तू येतात, तर विशेष काळजी कचऱ्यात जुने बॅटऱ्या, मुदत संपलेली औषधे, सिरिंज, पेट कॅन, बल्ब आणि ट्यूबलाईटसारख्या संवेदनशील वस्तूंचा समावेश आहे.
या अभियानाच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. शिक्षात्मक कारवाई हा उद्देश नसून जनजागृतीद्वारे शहरात स्वच्छतेची संस्कृती रुजवून ‘4 बिन ठाणे क्लीन’ अभियान यशस्वी करणे हेच महापालिकेचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.