
ठाणे, (11) : ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सोमवार, दिनांक 15 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येणार आहे. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष “शाळा प्रवेशोत्सव” साजरा करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले, टाळ्यांच्या गजरात आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे.
या प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करणे, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार करणे तसेच पालकांचा सहभाग वाढविणे हा उद्देश आहे. यानिमित्ताने महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले असून शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात येणार आहेत. काही शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागतगीते आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व शाळांना आवश्यक सूचना दिल्या असून प्रत्येक विद्यार्थ्याचे हसतमुखाने स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेतील पहिला दिवस आनंददायी ठरावा आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
15 जून रोजी होणाऱ्या या प्रवेशोत्सवामुळे महापालिका शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या वातावरणात होणार असल्याचे उपायुक्त डॉ मिताली संचेती व शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी नमूद केले.