
ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसरासह कोपरीतील वाहतुकीला शिस्त लागणार असून, तज्ज्ञ वाहतूक सल्लागार नेमण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून महापालिकेकडे पाठपुरावा केला जात आहे. भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे माजी प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या मागणीनंतर वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केल्या असून, विविध उपायांमुळे नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार आहे.
ठाणे पूर्व भागातील नागरिक सकाळी व सायंकाळच्या सुमारास वाहतूककोंडीने हैराण झाले आहेत. शाळेच्या बस, रुग्णवाहिका कोंडीत अडकण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्याकडे विविध उपाययोजना करण्याची मागणी केली होती. याबाबत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला जात होता. या उपाययोजना करण्यासंदर्भात भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्यासह पोलिसांकडून रेल्वे स्टेशन, ठाणेकरवाडी, कोपरी सर्कल, सिद्धार्थनगर, हसिजा कॉर्नर परिसरातील वाहतुकीची पाहणी करण्यात आली.
कोपरी परिसराचा रोड मॅप करण्याची मागणी भरत चव्हाण यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे तज्ज्ञ वाहतूक सल्लागार नियुक्तीची मागणी केली आहे.त्याचबरोबर कोपरी परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सूचनांवरही विचार केला जाणार आहे. आगामी काळात टेलीफोन नाका व काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू केली जाईल. तसेच काही रस्ते एकदिशा केले जाणार आहेत. तर बेशिस्त वाहनचालकांविरोधात ऑनलाईन कॅमेऱ्यांद्वारे कारवाई केली जाणार आहे.
कोपरी परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डनची मागणी महापालिकेकडे करण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी शेकडो वाहने कोपरीमार्गे रवाना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यावर आणखी विशेष मार्गिका तयार केली जाणार आहे. वाहतूककोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिकांना रस्ता देण्यासाठी वाहतूक अंमलदारांना सूचना दिल्या असून, अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
कोपरी परिसरात सकाळी व सायंकाळी येणाऱ्या बस एकाच मार्गिकेतून नेण्यासाठी पोलिसांकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच सॅटीस ब्रिजखाली पक्के डिव्हायडर उभारले जाणार आहेत.