
नवरात्रीच्या उत्साहात रंग भरण्यासाठी ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘निघाली राधा सोडूनी गोकुळा’ हे गरबागीत नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आकर्षक संगीत, रंगीबेरंगी दृश्यरचना आणि दमदार नृत्याची मेजवानी असलेल्या या गाण्यात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांची नृत्य अदाकारी पाहायला मिळत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर झाली असून ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओंकार मंगेश यांनी लिहिलेल्या या गाण्याला पंकज पडघण यांनी संगीत दिले असून आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी ते आपल्या दमदार आवाजात गायले आहे. पारंपरिक गरब्याचा ठेका आणि आधुनिक संगीताचा साज यांचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो. सुजित कुमार यांच्या कोरिओग्राफीने गाण्याची रंगत अधिक वाढवली आहे. कलाकारांचा उत्साही परफॉर्मन्स आणि नवरात्रीचा जल्लोष यामुळे हे गाणे तरुणाईसह सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करेल, अशी अपेक्षा आहे.
दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी सांगितले की, नवरात्रीचा रंग, उत्साह आणि आनंद गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शब्द, संगीत आणि कलाकारांची ऊर्जा यांचा सुंदर मेळ या गाण्यात साधण्यात आला असून प्रेक्षकांना या गाण्यावर गरबा खेळण्याचा आनंद घेता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संगीतकार पंकज पडघण यांनीही गाण्यात पारंपरिक गरब्याचा बाज कायम ठेवत आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश आणि एनर्जेटिक साउंड देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळी ऊर्जा मिळाली असून कलाकारांचा उत्साही परफॉर्मन्स आणि कोरिओग्राफीमुळे त्याची रंगत वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
निर्माते मनोज खळतकर यांनी नवरात्रीच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी आनंददायी आणि ताल धरायला लावणारे गाणे सादर करता आल्याचा आनंद व्यक्त केला. संगीत, शब्द, नृत्य आणि रंगीबेरंगी मांडणी यांचा सुरेख संगम या गाण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत ‘मैत्रेया’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केले आहे. मनोज खळतकर निर्माते, तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आता २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून, नव्या गरबागीतामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.