
ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व सहाय्यभूत साधनांचे वितरण महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महापालिका शाळा क्र. 19, विष्णुनगर येथे सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपआयुक्त (शिक्षण) डॉ. मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेखर वंडे तसेच गट अधिकारी संगीता बामणे उपस्थित होते.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन व महानगरपालिका कटिबध्द असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देण्यासा महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी 17 दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, ट्रायपॉड, रोलॅटर (Rollator), वॉकर, एल्बो क्रचेस (Elbow Crutches), टीएलएम किट, हिअरिंग एड किट तसेच इतर आवश्यक सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात आले. या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सुलभता वाढून त्यांचा आत्मविश्वास बळकट होण्यास तसेच स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमास लाभार्थी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विशेष शिक्षक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले. समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.