
ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गणेशोत्सवादरम्यान संकलित होणाऱ्या निर्माल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दीड दिवसाच्या कालावधीत २० हजार ७०३ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून, सुमारे १८ हजार ६०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संकलित करण्यात आलेल्या निर्माल्याचे विकेंद्रीत पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येत आहे. हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क तसेच कौसा येथील मेकॅनिकल बायो-कंपोस्टिंग प्रकल्पांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनुसार निर्माल्यावर प्रक्रिया केली जात आहे.
संकलित निर्माल्यामध्ये साधारणपणे ३ टक्के प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण आढळून आले आहे. हे प्लास्टिक निर्माल्यापासून वेगळे करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्यात येत असून, त्याचे व्यवस्थापन MRF सेंटरमध्ये करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. या माध्यमातून निर्माल्य नदी, तलाव, खाडी अथवा इतर जलस्रोतांमध्ये जाण्यापासून रोखून जलप्रदूषणाला आळा घालण्यास मदत होत आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनाला नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.