
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अखेर आपल्या पूर्वघोषित नियोजनानुसार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून त्यांचा ताफा मुंबईकडे निघाला असून, मोठ्या संख्येने मराठा समर्थकही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
15 सप्टेंबर रोजी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी यापूर्वीच केली होती. त्यानुसार 19 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आमरण उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
# पोलिसांच्या परवानगीचा पेच कायम
मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी परवानगी मिळण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. सुरक्षेचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत आझाद मैदान पोलिसांनी यापूर्वी दोनदा अर्ज फेटाळल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, आंदोलनावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, 19 सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन करणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.