
ब्रह्मज्ञानाच्या शिकवणी जीवनात आचरणात आणणे म्हणजेच जागृती – निरंकारी सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज
समालखा, 28 ऑक्टोबर 2026– “ब्रह्मज्ञानाची खरी सार्थकता ते जीवनात आत्मसात करण्यात आणि आपल्या विचारांमध्ये, वागणुकीत तसेच कर्मांमध्ये त्याचा समावेश करण्यात आहे.” हे दिव्य विचार सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी 79 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोपाच्या दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रद्धाळूंना आपल्या पावन आशीर्वचनांतून प्रदान केले.

‘जागृती’च्या आध्यात्मिक प्रेरणा जीवनात आत्मसात करून स्वतःच्या उन्नतीसोबतच जगाच्या कल्याणाची भावना दृढ करणारा हा पावन संत समागम काल रात्री प्रेमभक्ती आणि श्रद्धेने ओतप्रोत वातावरणात संपन्न झाला. समागमातून आध्यात्मिक प्रेरणा आणि मधुर स्मृती घेऊन श्रद्धाळू भक्तगण हळूहळू आपापल्या गंतव्यस्थानांकडे प्रस्थान करू लागले.
सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी विशाल मानव परिवाराला संबोधित करताना आपल्या पावन प्रवचनांतून सांगितले की, ‘जागृती’ केवळ सत्संग किंवा समागमापुरती मर्यादित नसून, जीवनातील प्रत्येक क्षणी निराकार परमात्म्याच्या जाणीवेसह जगण्याचे नाव आहे. ब्रह्मज्ञानाची खरी सार्थकता तेव्हाच आहे, जेव्हा आपण ते आपल्या विचारांमध्ये, वागणुकीत आणि कर्मांमध्ये आचरणात आणतो.

सत्गुरू माता जी यांनी सकारात्मक विचार, प्रेम, करुणा आणि विनम्रता अंगीकारण्याची तसेच इतरांच्या कमतरतांऐवजी त्यांच्यातील गुण पाहण्याची प्रेरणा दिली. खरी जागृती आपल्या घरापासून, कुटुंबापासून आणि वैयक्तिक जीवनापासून सुरू होते. सेवा, सुमिरन आणि सत्संग यांना जीवनाचा अविभाज्य भाग मानून प्रत्येक परिस्थितीत परमात्म्याची जाणीव कायम ठेवणे, हेच जीवन सुखमय आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनवते.
या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा यांनी सत्गुरू माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांचे पावन दर्शन घेऊन त्यांच्या दिव्य आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, समस्त साध-संगत आणि समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सरकारी विभागांचे मनःपूर्वक आभार मानले. यावर्षीच्या समागमात मागील वर्षांच्या तुलनेत अधिक संख्येने श्रद्धाळू सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि भविष्यातही संगतीच्या संख्येत सातत्याने वाढ होत राहावी, अशी मंगलकामना केली.
कवी दरबार
यावर्षी समागमाच्या चारही दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या कवी दरबारात बालकवींंसह महिला आणि पुरुष कवींनी उत्साहाने सहभाग घेतला. हा कार्यक्रम समागमातील प्रमुख आकर्षणांपैकी एक ठरला. या प्रसंगी ८० कवींनी ‘जागृती’ या विषयावर आधारित आपल्या स्वरचित कविता हिंदी, राजस्थानी, पंजाबी, इंग्रजी, हरियाणवी, मुलतानी, मराठी, भोजपुरी आणि संस्कृत यांसह विविध भाषांमध्ये सादर केल्या. या भावपूर्ण काव्य सादरीकरणांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद घेतला.

अशा प्रकारे, 79 वा वार्षिक निरंकारी संत समागम सत्गुरूंच्या दिव्य संदेशाने, प्रेम, भक्ती आणि मानवतेच्या भावनांनी ओतप्रोत वातावरणात संपन्न झाला. निःसंशयपणे, हा पावन संत समागम आध्यात्मिक जागृती आणि सद्भावनेचा एक अनुपम संगम ठरला. या समागमाने विविधतेत एकता आणि संपूर्ण मानवजातीला प्रेमाच्या एका सूत्रात बांधण्याचा दिव्य संदेश दिला.