
भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याकडून आनंदनगर अग्निशमन केंद्राची पोलखोल
ठाणे, दि. 26 | घोडबंदर रोडवरील हजारो इमारती व झोपडपट्टीमध्ये आग लागल्यास तत्काळ पोचण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाने अवघ्या 500 लिटरचा बंब सज्ज ठेवला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून आनंदनगर-ओवळा येथे चार वर्षांपूर्वी उभारलेली अग्निशमन केंद्राची सुसज्ज इमारत चक्क रिकामी आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे व नगरसेविका अनिता ठाकुर यांनी अग्निशमन केंद्राला आज भेट देऊन घोडबंदर रोडवरील रहिवाशांची अग्निसुरक्षा बेभरवशाची असल्याचे उघडकीस आणले.
वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर रोड येथे उभारलेल्या ओवळा अग्निशमन केंद्राचे २३ फेब्रुवारी २०२२ मध्ये उद्घाटन करण्यात आले. या इमारतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. अग्निशमन दलाची चार वाहने उभी करण्यासाठी जागा तयार करण्यात आली. परंतु, या ठिकाणी अग्निशमन दलाने जुजबी यंत्रणा उभारली. केवळ एक क्यूआरव्ही (क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल) ठेवून, अवघ्या तीन फायरमन व एका ड्रायव्हरची नियुक्ती करण्यात आली आहे. या गाडीमध्ये केवळ ५०० लिटर पाणी ठेवण्याची सुविधा आहे. एखादी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर बाळकूम केंद्रातून वाहने मागविली जातात. त्यात किमान अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात आग फोफावल्यानंतर मोठे नुकसान झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

ओवळा अग्निशमन केंद्रात अवघ्या ५०० लीटरचा बंब असल्याचे लक्षात आल्यानंतर नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यावेळी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आनंदनगर केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे झळके यांनी सांगितले. गेल्या ८ महिन्यांपासून भरतीचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे झळके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सुमारे १५ दिवसांपूर्वी भाईंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा संकुलातील इग्निस इमारतीतील १६ व्या मजल्यावर सायंकाळी आग लागली. त्यावेळी घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडीमुळे अग्निशमन दलाची गाडी तब्बल पाऊण तासाने पोचली. इमारतीतील अग्निविरोधी यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राम ठाकुर यांनी दिली.
——————————–